मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी व आपने पंजाबमध्ये एकला चलोचा नारा दिला. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडल्यानंतर महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीने बैठक बोलवली आहे. नरिमन पॉईंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खा. विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
महायुतीला रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लोकसभा निवडणूक लढणार असून त्यासाठी जागावाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३५ हून अधिक जागांवर तडजोड झाली आहे. आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर येणार नसले, तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून धैर्यवर्धन पुंडकर उपस्थितीत राहणार आहेत.