इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः गेल्या सहा वर्षांत बाल बलात्काराच्या घटनांमध्ये ९६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बाल हक्क स्वयंसेवी संस्था ‘चाइल्ड राइट्स अँड यू’ (क्राय) ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’ (एनसीआरबी) च्या डेटा विश्लेषणाच्या आधारे जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे, की २०१६ ते २०२२ दरम्यान मुलांवर बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. फक्त २०२० मध्ये, कमी प्रकरणे दिसली; परंतु इतर वर्षांमध्ये प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. ‘क्राय’चे संचालक सुभेन्दू भट्टाचार्जी यांनी सांगितले, की, लोकांमध्ये जागरुकतेमुळे मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांची नोंद होण्याचे प्रमाण वाढले आहे.
हेल्पलाइन, ऑनलाइन पोर्टल आणि विशेष एजन्सींच्या माध्यमातून हे गुन्हे उघडकीस आणण्यातही ते यशस्वी झाले आहेत. ‘क्राय’ च्या विश्लेषणानुसार, २०१६ पासून बलात्कारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. एका वर्षात ६.९ टक्के वाढ झाली. गेल्या सहा वर्षांत बलात्कार आणि बलात्काराच्या प्रयत्नांशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासात एकूण ९६.८ टक्के वाढ झाली आहे. २०१६ मध्ये एकूण १९ हजार पाचशेहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली होती, ती २०२२ मध्ये ३९ हजारांवर पोहोचली.