नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे नाव आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातून आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप केला. त्यानंतर पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी थेट भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या सर्व आरोपानंतर दादा भुसे यांनी त्याला प्रत्त्युतर देत या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. अंधारे यांनी एेकीव माहितीच्या आधारे आरोप केल्याचे ते म्हणाले. चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिध्द न झाल्यास मानहानीचा दावा करणार असल्याचे सांगितले.
याअगोदर या प्रकरणात काँग्रसेच आमदार रविंद्र धंगेकर यांनी ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिंदे गटाच्या एका आमदाराने फोन आल्याचे सांगितले होते. त्यानंतर अंधारे यांनी थेट नाव घेतले. त्यामुळे आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. ललित पाटील हा मुळचा नाशिक येथील असून तो ससून हॅास्पिटलमधून पोलिसांच्या हाताला तूरी देऊन पळून गेल्यानंतर पोलीस आक्रमक झाले आहे.
मुंबई पोलिसांनी नाशिक येथे ३०० कोटीचे ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी ड्रग्ज अ्ड्डयावर छापा टाकत ५ कोटीचे ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी ललित पाटील यांच्या घरावरही छापा टाकला. त्यानंतर नाशिकमधून फरार झालेले भूषण पाटील, अभिषेक बलकवडे हे फरार झाले होते. त्यांनाही पोलिसांनी वाराणसी येथून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हे ड्रग्ज प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे..