नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १६ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निव़डणुकीमुळे पुन्हा एकदा राज्याचे राजकारण चांगलेच तापणार आहे. या निवडणुकीत भाजपचे तीन, शिंदे व अजित पवार व काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार सहज निवडून येऊ शकतो. तर ठाकरे व शरद पवार गटाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांचा एकही खासदार या निवडणुकीत निवडून जाऊ शकत नाही. या निवडणुकीत एकुण ४२ मतांची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत विधानसभेतील २८८ आमदार मतदान करणार असून त्यात एक जागा रिक्त असल्यामुळे २८७ आमदारांना मतदानांवर हे सहा जण निवडणून जाणार आहे. भाजपचे १०४ आमदार असून त्यांना १३ अपक्षाने पाठींबा दिल्यामुळे त्यांचे तीन सदस्य निवडून जाऊ शकतात. काँग्रेसचे ४५ आमदार असल्याने या पक्षाचा एक उमेदवार निवडून येईल. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ४० पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा असून, १० अपक्ष व इतर आमदारांचा पाठींबा आहे. त्यामुळे त्यांचा एक सदस्य निवडून येईल. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातो. या संख्याबळाच्या आधारे अजित पवार गटाला एक जागा मिळेल. उद्धव ठाकरे गटाकडे १५ तर शरद पवार गटाकडे १० आमदार असल्यामुळे त्यांचा एकही सदस्य निवडून येणार नाही. या दोघांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना संधी नाही.
महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री अनील देसाई, प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, व्ही. मुरलीधरण, नारायण राणे आणि श्रीमती वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. यात भाजपकडून राणे यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर व्ही. मुरलीधरण व जावडेकरांचा पत्ता कट होणार आहे. शिंदे गटाकडून देवराची वर्णी लागणार आहे. तर अजित पवार गटाकडून पार्थ पवाराचे नाव चर्चेत आहे.
अशा आहे राज्यातील जागा
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. दिनांक 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून 16 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार. 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. 29 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.
असे असेल मतदान
निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषत- जांभळ्या (Violet) रंगाची स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचे तसेच, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबतचेही त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.