नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भुजबळांनी घेतलेल्या भूमिका वैयक्तीक असल्याचे सांगत राष्ट्रवादीने एकीकडे हात झटकले असतांना आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भुजबळांची कोंडी झाली आहे. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय झालेला नाही, असे तायवाडे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, की सगेसोयरे मसुदा जुन्याच मसुद्यासारखाच असल्याने ओबीसींचे वाटेकरी वाढणार नाही. मराठा समाजातील आता मिळालेल्या ५७ लाख नोंदीही जुन्याच आहेत. नव्याने कुणबी प्रमाणपत्र दिलेल्यांची संख्या नगण्य आहे.
कुणबी नोंदी असणाऱ्या व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाला ओबीसीमधून विरोध होत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीत सगेसोरऱ्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु सगेसोयरेवरून ओबीसी नेत्यांमधील बेबनाव उघड झाला आहे.
भुजबळ यांनी रविवारी मुंबईत घेतलल्या बैठकीत ओबीसींनी गटतट बाजूला ठेऊन एकत्र यावे, असे आवाहन केले. ओबीसीमधील ३७४ जातींनी एकत्र येऊन आपआपल्या आमदार, खासदार आणि तहसीलदारांकडे एक तारखेला ओबीसी आरक्षणाचा बचाव करण्याच्या मागण्या करा, असे त्यांनी सांगितले. भुजबळ यांच्यासोबत आंदोलनात सहभागी व्हायचे, की नाही याबाबत पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.