इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे लंडनवारी करू पाहणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, महिलेने सादर केलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर स्वाक्षरी असलेले कुलगुरू त्या कालावधीत विद्यापीठात कार्यरत नसल्याचे उघड झाले आणि बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे महिला लंडनमध्ये जात असल्याचे उघड झाले. याप्रकरणी महिलेविरोधात सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रे सादर करून विविध प्रकारचे लाभ घेण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असतात. पण, अशा प्रकारे परदेशवारी करण्याचा प्रकार इतक्यातच उघडकीस आला आहे. गुजरातमधील रहिवासी असलेली या महिलेचे नाव वैशालीबेन पारेख आहे. ती सोमवारी दुबईमार्गे लंडनला जात होती. त्यावेळी तिने सादर केलेल्या विविध कागदपत्रांची विमानतळावर इमिग्रेशन विभागातर्फे तपासणी करण्यात आली. वैशालीबेन कुशल कामगार व्हिजावर प्रवास करत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाहिले. त्यामुळे अधिकाऱ्याने महिलेचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासले.
प्रमाणपत्रानुसार महिला २०१० मध्ये गुजरात विद्यापीठातून पदवीधर झाली होती. या प्रमाणपत्रावर कुलगुरू म्हणून ओ. पी. कोहली यांची स्वाक्षरी होती. इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आल्यामुळे त्याने गुजरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तपासले असता २०१० ते २०११ या कालावधीत गुजरात विद्यापीठात कमला बेनीवाल या कुलगुरू होत्या. त्यामुळे महिलेचे शैक्षणीक प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. युके वाणिज्य वकिलातीला बनावट प्रमाणपत्र सादर करून महिलेने कुशल कामगार व्हिजा मिळवला होता. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
एजंटची होणार चौकशी
बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेने चौकशीत लंडनमधील एजंट अंकुर पटेल याच्याकडून बनावट प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगितले. याबाबत पोलिस अधिक तपास करीत असून एजंटचीदेखील चौकशी होण्याची माहिती आहे.