इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगडः हरियाणातील आगामी विधानसभा निवडणूक ‘आप’ एकट्याने लढणार असल्याचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.
ते म्हणाले, की पक्ष हरियाणातील विधानसभेच्या नव्वद जागा ‘आप’ स्वबळावर लढवणार असला, तरी या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते ‘इंडिया’ आघाडीसोबत लढतील. केजरीवाल यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पंजाबमध्ये लोकसभा निवडणूक ‘आप’स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाही. ‘इंडिया’ आघाडीला धक्का देत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. बिहारमधील नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडला आहे; मात्र हरियाणातील लोकसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी दरवाजे खुले ठेवले आहेत.
केजरीवाल म्हणाले, ‘आज लोकांचा फक्त एकाच पक्षावर विश्वास आहे, तो म्हणजे ‘आम आदमी पक्ष’. एका बाजूला त्यांना पंजाब दिसतो, तर दुसरीकडे दिल्लीत आमचे सरकार. आज हरियाणात मोठा बदल घडवील. आधी दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकांनी हा मोठा बदल केला आणि आता तिथले लोक आनंदी आहेत. हरियाणात आम्ही पुढचे सरकार स्थापन करू. हरियाणा विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याच्या केजरीवाल यांच्या घोषणेने ‘इंडिया’आघाडीसाठी अडचणीचे ठरले आहे. एकीकडे सर्व राज्यात युती एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे त्यात सामील असलेले पक्ष एक एक करून वेगळे होत आहेत.