इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतल्याने ते मराठा समाजाचे ‘हीरो’ ठरले आहे. शिंदेच ‘स्ट्राँग’ मराठा लीडर झाले. त्यांनी सगळ्यांना ‘क्लिन बोल्ड’ केले आहे. शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे,’ असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे.
एकीकडे आंबेडकर यांचा पक्ष वंचित आघाडी महाविकास आघाडीत जाणार असून त्यांच्या पक्षाला शिवसेनेच्या ठाकरे गटातून दोन जागा देण्याची तयारी दाखवल्याने आता ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. ॲड. आंबेडकर म्हणाले, की मराठा समाजातील नेते झोपले होते. मराठा समाजातील जनतेला मराठा नेत्यांबद्दल चीड असताना शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती दिसते आहे. मराठा आरक्षणासाठी शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे ते ‘स्ट्राँग मराठा लीडर’ म्हणून पुढे आले आहेत. शिंदे यांच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते ‘क्लीन बोल्ड’ झाले आहेत.
मराठा समाजाच्या इतर नेत्यांच्या पुढे शिंदे फार पुढे गेले आहेत. ते धाडसी आणि चांगला माणूस आहेत, अशी सहानुभूती समाजात निर्माण झाली आहे. शिंदे यांच्यामुळे भाजपचे मोठे नुकसान होणार आहे. भाजपने शिंदे यांना पुढे करून ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला; परंतु मराठा समाज आणि ओबीसी समाजाचाही फटका भाजपलाच बसणार आहे, असे मत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केले.
ओबीसी आणि मराठा समाजात दरी वाढली आहे. ओबीसी समाजाचे नेते या विरोधात कोर्टात जातील, असे सांगून त्यांनी आमच्या हाती सत्ता आल्यावर आम्ही आरक्षणाचा फॉर्म्युला देऊ, असे ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.