इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः नव्या अधिसूचनेनुसार सग्यासोयऱ्यांना कुणब्याचे एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आंतरवाली सराटीसह राज्यात मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत, तर आमचा दणका दिसेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
मराठा समाजाला ९९ टक्के टक्के आरक्षण मिळाले आहे. सरकारने काढलेल्या राजपत्राची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आवाहन करून जरांगे म्हणाले, की मराठा युद्धात हरले नाहीत, तर पोर गेले आणि आरक्षण घेऊन आले. मराठा आरक्षणाचा कायदा बनवताना सरकारने १५ दिवस वेळ घेतला. त्यासाठी सरकारने तज्ज्ञांची मदत घेतली. विरोध करणाऱ्याला आम्ही शांततेत उत्तर देणार आहोत.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अधिसूचनेवर विरोधकांनी काही हरकती घेतल्या, तर आपणही हरकती घेतल्या पाहिजेत. आपल्याला मिळालेल्या राजपत्राचे कायद्यात रूपांतर होणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली. विदर्भात मराठ्यांना ८० ते ८२ टक्के आरक्षण, पश्चिम महाराष्ट्रात ४५ टक्के आरक्षण आहे, असे निदर्शनास आणून ते म्हणाले, की कोकण आणि खानदेशात शंभर टक्के आरक्षण नाही.