नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात बेकायदा दारू विक्री करणा-यांना पोलीसांनी पुन्हा एकदा आपल्या रडारवर घेतले असून, शनिवारी (दि.२७) वेगवेगळया भागात छापे टाकून चार मद्यविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात बेकायदा दारू विक्रीचे पेव फुटले आहे. यापार्श्वभूमीवर दारू विक्रेत्यांना पोलीसांनी रडारवर घेतले असून सर्वत्र छापेमारी सुरू आहे. सातपूर येथील प्रबुध्दनगर भागात पोलीसांनी मुकेश नागेश पाटील (५५ रा.प्रबुध्दनगर) याच्या मुसक्या आवळल्या. सार्वजनिक शौचालयाच्या आडोशाला संशयित दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून १ हजार ७५० रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.
दुसरी कारवाई इंदिरानगर झोपडपट्टी भागात करण्यात आली. पहाडी बाबा मंदिर परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये दादा कोंडाजी जोंधळे (४६ रा.एकलहरारोड) हा दारू विक्री करतांना आढळून आला. संशयिताच्या ताब्यातून सुमारे ९१० रूपये किमतीच्या प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलीस शिपाई उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.
तिसरी कारवाई भारतनगर येथे करण्यात आली. विरेंद्र यशपाल शर्मा (४१ रा.चांद शहावली दर्गाजवळ) हा आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवानगी दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून १ हजार ५० रूपये किमतीच्या टँगो पंच नावाच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी अंमलदार फरिद इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.
तर धिरज सुधाकर कर्डक (४२ रा.इंदिरागांधी झोपडपट्टी,आगरटाकळीरोड) हा शनिवारी आपल्या राहत्या घरात दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे ५६० रूपये किमतीचा देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी अंमलदार मुकेश क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.