नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्ज काढून देण्याचा बहाणा करून भामट्याने एकास ७५ हजार रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. आगाऊ रक्कम घेवूनही कर्ज न मिळाल्याने फसवणुक झालेल्या तरूणाने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय रामचंद्र येवलेकर (४९ रा.नवले चाळ,उड्डाणपूलाखाली ना.रोड) असे तरूणास गंडविणा-या भामट्याचे नाव आहे. याबाबत मयुर उर्फ बंटी नवनाथ ढगे (२५ रा.गाडेकर मळा,सामनगावरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. ढगे हा युवक आर्थिक अडचणीत असल्यामुळे बँकेतून कर्ज काढण्याच्या तयारीत असतांना त्यास संशयिताने गाठले. यावेळी आपल्या वेगवेगळया बँकामध्ये ओळखी असल्याचा दर्शवून भामट्याने हा गंडा घातला.
कर्ज काढून देतो असे सांगून भामट्याने त्या मोबदल्यात काही रक्कम लागेल असे सांगितले. त्यामुळे ढगे यांनी त्यास पैसे देण्याची तयारी दर्शविली. गेल्या महिन्यात आगाऊ म्हणून तब्बल ७५ हजार ७०० रूपयांची रक्कम रोख व फोन पे द्वारे स्विकारली. मात्र महिना उलटूनही कर्जाची कुठलीच तरतुद केली नाही. त्यामुळे फसविले जात असल्याचे लक्षात येताच ढगे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हांडोरे करीत आहेत.
………