रहिमतपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्रतिष्ठापणेनिमित्त सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर हे रामोत्सवात रंगल्याचे पहायला मिळाले. येथील प्राचिन श्रीराम मंदिरात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. खास म्हणजे, रहिमतपुरकरांनी संपूर्ण देशाला आदर्श वाटावे अशी कृती करुन सर्वांचीच मने जिंकली आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रहिमतपुरातील तिन्ही धर्मांच्या प्रार्थनास्थळांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर राम मंदिरातील किर्तनात मुस्लीम तबलावादकाने सहभाग घेऊन जय श्रीरामचा नारा दिला.
अयोध्येतील नव्या मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही संपूर्ण देशवासियांसाठी जणू अस्मितेची बाब होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उत्सव काळात स्वच्छतेचे आवाहन केले. रहिमतपूरकरांनी त्यास भरभरुन दाद दिली. म्हणूनच येथील श्रीराम मंदिरासह जैन मंदिर आणि मशिदीतही स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला. अशा प्रकारे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये स्वच्छता उपक्रम घेऊन रहिमतपूरकरांनी देशभरात मैलाचा दगड प्रस्थापित केला. तसेच, या उपक्रमामुळे रहिमतपुरात खऱ्या अर्थाने चैतन्य पसरले. त्यानंतर रामोत्सवच साजरा झाला.
श्रीराम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे मंदिराला आकर्षक सजावट केली. लक्षवेधी रोषणाई हा त्याचाच एक भाग होता. त्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यमयी बनले. सकाळपासूनच भाविकांनी श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास विशेष किर्तनाचे आयोजन करण्यात आले. कोरेगाव येथील ख्यातनाम किर्तनकार श्रीमती पौर्णिमा नातू यांनी किर्तनातून श्रीरामांच्या जीवनकार्याविषयी प्रबोधन केले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता श्रीरामांची आरती करण्यात आली. त्याचवेळी अयोध्येतील सोहळा सुरू झाला असतानाही भाविकांनी मंदिरात आरतीसाठी गर्दी केली. आरतीनंतर भाविकांची दर्शनासाठी भली मोठी रांग बघायला मिळाली. याच काळात श्रीराम नामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. भगवे कपडे, भगवी टोपी, भगवे झेंडे या साऱ्यामुळे मंदिराचा परिसर भगवा झाला होता. भाविकांनी उत्स्फुर्तपणे प्रसाद आणून त्याचे वाटप केले.
याप्रसंगी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा श्रीमती चित्रलेखाताई कदम, अरुण माने, अशोक लोखंडे, जनार्दन किरपेकर, राजू टांकसाळे, संतोष नाईक, जगन्नाथ तारखे, सचिन भंडारी, निलेश माने, रणजित माने, श्रेयस टांकसाळे, सतीश भोसले आदी उपस्थित होते.
अठराव्या शतकात जीर्णोद्धार
येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार अठराव्या शतकात करण्यात आला आहे. त्यावेळी हे मंदिर कमंडलू नदीत होते. नदीला वारंवार पूर येत असल्याने भाविकांना श्रीरामांचे दर्शनही घेता येत नसे. त्यामुळे नव्याने मंदिर बांधून तेथे मूर्ती स्थापित करावी, असे वचन कै. गंगाधरपंत शेंडे यांनी त्यांच्या वडिलांना दिले होते. त्यानुसार गंगाधरपंत यांनी ते वचन पूर्ण केले. अतिशय देखण्या अशा या मंदिरात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची सुबक मूर्ती स्थापित करण्यात आली. कै. गंगाधर शेंडे हे डॉ. राजेंद्र शेंडे यांचे आजोबा आहेत. हे मंदिर रहिमतपूरकरांचे श्रद्धास्थान आहे. सोमवारी याठिकाणी अभूतपूर्व उत्साह पहायला मिळाला.
शेख यांचे ४० वर्षांपासून तबलावादन
नातू यांच्या किर्तनावेळी पिंप्री येथील दादा कदम यांनी हार्मोनिअम तर मुबारक शेख यांनी तबल्याची साथसंगत केली. शेख हे गेल्या ४० वर्षांपासून तबला वादनाचे कार्य करतात. त्यांचे आजोबा आणि वडिल हे सुद्धा तबलावादक होते. अब्दुल अमीन शेख या वडिलांकडूनच त्यांनी तबल्याचे धडे घेतले. श्रीराम मंदिरातील उत्सवासाठी जायचे असल्याने त्यांच्यामध्येही विशेष उत्साह होता. प्रभू श्रीराम हे केवळ कुणा एका धर्माचे नसल्याची प्रचिती यानिमित्ताने सर्वांना आली. त्यामुळेच त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. रहिमतपूरने स्वच्छता आणि किर्तन सोहळ्याद्वारे संपूर्ण भारतातच वेगळेपण सिद्ध केले आहे.