इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना : मराठा आरक्षणाचा लढा सुरू झालेल्या आंतरवाली सराटी गावात परतचाच मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. त्यांनी गावात येताच जरांगे यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना, ‘वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका,’ असा सल्ला गावकऱ्यांना दिला.
जरांगे म्हणाले, की घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट आणि उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया लक्षात घ्या. बाकीचे लोक वाया गेलेले लोक आहेत. त्यांचे काही मनावर घ्यायची गरज नाही. कायदा मंजूर झाल्यानंतर त्याला कोणीही आव्हान देऊ शकते. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले, की मराठ्यांचा सातबारा पक्का झाला असे समजा.
उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, की विश्वास बसत नाही एवढे मोठे काम झाले आहे. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी अधिवेशन बोलवावे लागणार आहे. कायदा कायमचा राहणार आहे. नोंदी मिळालेल्यांना आरक्षण मिळाले आहे. मुंबईच्या गल्ली गल्लीत जमा व्हा या माझ्या आवाहनानुसार मराठे खरेच जमले. अहमदनगरच्या पुढे रस्ताच दिसला नाही, एवढी गर्दी जमा झाली होती. पुण्यात ६४ किलोमीटर लाईन होती. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या असल्याने शिंदे समितीला मुदतवाढ मंजूर करून घेतली आहे. समाजासाठी खूप मोठा कायदा झाला आहे. आता मराठ्यांच्या पोरांचे भविष्य कोणी थांबवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.