इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना आज राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. या आघाडीसाठी खूप मेहनत घेतली. पण, त्यात काही काम झाले नाही. लालू की पार्टी का व्यवहार ठीक नाही असेही त्यांनी सांगितले. आता मी भाजप बरोबर जाईल असेही त्यांनी सांगितले.
आता नितीशकुमार हे भाजपसोबत सरकार बनवणार हे निश्चित झाले आहे. राज्यात भाजपचे दोन उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकतात. सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची नावे पुढे आली आहेत. आज भाजपनेही आमदारांची बैठक बोलावली त्यानंतर भाजप बरोबर जाण्याचे आता निश्चित झाले आहे.
संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस युती तुटण्याच्या मार्गावर आहे. नितीश कुमार पुन्हा ‘एनडीए’मध्ये सामील झाले आहे. लोकसभेच्या ४० जागा आहेत. त्यापैकी १७ जागांवर भाजपचे खासदार आहेत, तर संयुक्त जनता दलाचे १६ खासदार खासदार आहेत. नितीशकुमार यांनी भाजपसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले, तर चौथ्यांदा त्यांनी बाजू बदलली आहे. सध्या बिहार विधानसभेत संयुक्त जनता दलाचे ४५, राष्ट्रीय जनता दलाचे ७९, भाजपचे ७८, काँग्रेसचे १९ सीपीआय (एम-एल) १२, सीपीआय (एम) आणि सीपीआय प्रत्येकी दोन, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे चार आणि ‘एआयएमआयएम’ चा एक आमदार आहे, तर एक अपक्ष आमदार आहे.