नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या वर्षी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिल्हा रुग्णालय नाशिक चा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. वर्षभरात एकूण 438 रुग्णांना या योजने अंतर्गत विनामूल्य शस्त्रक्रिया आणि उपचार जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेले आहेत.
जिल्हा शासकीय रूग्णालयात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवण्यात येतात. जास्तीत जास्त रुग्णांनी या योजनांचा लाभ घ्यावा यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय नेहमीच प्रयत्नशील आहे. या योजनेंतर्गत रूग्णांना विनामूल्य आणि दर्जेदार उपचार मिळतात. मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामकाजाचे राज्य स्तरावर मूल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या रुग्णालयांचा गौरव दरवर्षी करण्यात येतो.
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया, जळीत कक्ष उपचार आणि शस्त्रक्रिया, बाल अतिदक्षता विभागातील उपचार, जनरल सर्जरी , कान नाक घसा विभागाच्या शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील विशेषज्ञ उपचार या सर्व विभागांनी उत्कृष्ट कामकाज करून या योजनेचा लाभ रुग्णांना दिला आहे.
या योजनेच्या यशस्वितेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ निलेश पाटील, योजनेचे नोडल अधिकारी डॉ बाबासाहेब देशमुख, जिल्हा रुग्णालयातील सर्व विभागप्रमुख, सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नाने रुग्णांना विनामूल्य उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण दिल्ली यांचे कडून जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त यादी मध्ये जिल्हा रुग्णालय नाशिक या शासकीय रूग्णालयाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. योजना सुरू झाल्या पासून पहिल्यांदाच इतर रुग्णालयांना मागे टाकून जिल्हा रुग्णालय नाशिकला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
जास्तीत जास्त रुग्णांना लाभ
अस्थिरोग शस्त्रक्रिया, नवजात बालकांवर उपचार, मेंदू विकारावरील शस्त्रक्रिया जळीत रुग्णांवरील उपचार या विभागामार्फत जिल्हा रुग्णालय नाशिक येथे एकत्रित आयुष्यमान प्रधानमंत्री भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनामध्ये रुग्ण समाविष्ट करून त्यांना नि:शुल्क लाभ देण्यात आला. यापुढेही जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि संदर्भ सेवा रुग्णालय प्रयत्नशील असतील.
डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकीत्सक
टीम यांचे मोलाचे सहकार्य
शासकीय आरोग्य संस्थेत येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर या योजने अंतर्गत विनामूल्य आणि दर्जेदार उपचार देण्यासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक मधील सर्व वैदयकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि महात्मा फुले योजनेचे समन्वयक डॉ पंकज दाभाडे आणि त्यांची टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
डॉ बाबासाहेब देशमुख