नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : गोड, रसाळ, कुरकुरीत चवीच्या आरा रंगीत वाणांच्या द्राक्षांची देशभरातील ग्राहकांना व खरेदीदारांचा चांगलीच भुरळ पडली आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी (ता.२६) ‘सह्याद्री फार्म्स’तर्फे कोने (ता.त्र्यंबकेश्वर) येथे आयोजित नव्या आरा रंगीत वाणांच्या पिक पाहणी व विक्री दिनी आला. यावेळी झालेल्या ऑनलाईन लिलावात देशाच्या विविध भागातील व्यापारी खरेदीदारांनी बोली लावली. या लिलावात द्राक्ष उत्पादक भास्कर कांबळे यांच्या आरा रंगीत २ वाणांपैकी एकाला प्रति किलोला २२० तर दुसऱ्या वाणाला २६० रुपयांचा दर मिळाला. यावेळी ग्राहकांनीही थेट शेतातून ही द्राक्षे खरेदी करीत या आराच्या विक्री दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नेपाळ मधील काठमांडू तसेच देशाच्या विविध भागातून द्राक्ष व्यापारी खरेदीदार या ऑनलाईन लिलावात सहभागी झाले होते. या द्राक्षांना अनोखी चव, गंध आणि कुरकुरीतपणा असल्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी होत असल्याचे खरेदीदार व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक माणिकराव पाटील, अरुण मोरे, वासुदेव काठे, अमित पडोळ, शरद ढोकरे, राजेंद्र बोरस्ते आदी मान्यवरांच्या हस्ते या नव्या रंगीत वाणांच्या खुडणीचा शुभारंभ करण्यात आला.
दर्जेदार द्राक्ष वाणांच्या उपलब्धतेबरोबरच त्याची बाजार व्यवस्था मजबूत करण्यावर ‘सह्याद्री फार्म्स’कडून भर दिला जात आहे. निर्यातीबरोबरच देशांतर्गत बाजारातही या वाणांना मोठी मागणी होत आहे व ती मोठी संधी असल्याचे सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले. द्राक्ष उत्पादकांच्या थेट शेतात होणारी ‘ऑनलाईन‘ लिलाव प्रक्रिया ही बाजार व्यवस्था पारदर्शक करणारी असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
यावेळी झालेल्या ऑनलाईन लिलावात श्री. कांबळे यांच्या आरा रेड सिलेक्शन- ५ द्राक्षांच्या ४ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या पेटीला १२५० रुपये म्हणजे प्रति किलोला २६० रुपये दर मिळाला. तर त्यांच्या आरा रेड सिलेक्शन-६ या दुसऱ्या वाणाच्या द्राक्षांच्या पेटीला १०६० रुपये म्हणजेच प्रति किलोला २२० रुपये दर मिळाला.
लिलाव प्रक्रियेत काठमांडू येथील जय माता दी फ्रुट कंपनी, दिल्ली येथील गुरु साई ट्रेडर्स, लुधियाणा येथील चुंग फ्रुट कंपनी, सिलिगुडी येथील श्री. दुर्गा स्टोअर, दिल्ली येथील गुरुकृपा फ्रुट एजन्सी, गंगानगर येथील पंजाब फ्रुट कंपनी या खरेदीदार कंपन्यांनी सहभाग घेतला. राज्यभरातून आलेल्या ग्राहकांकडून थेट शेतातून नव्या रंगीत द्राक्षांची खरेदी करीत पाहणी व विक्री दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तुषार जगताप यांनी ऑनलाईन लिलावाचे सुत्रसंचालन केले. मंगेश भास्कर यांनी प्रास्ताविक केले. पंकज नाठे यांनी आरा रेड सिलेक्शन वाणांविषयी सविस्तर माहिती दिली. भास्कर कांबळे यांनी आभार मानले.