सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊन नागरिकांना जण्यायेण्यासाठी मोठा त्रास होत होता. त्यावर ठोस उपाययोजना म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नायलॉन दोरीचा पॅटर्न राबवला आहे. सिन्नर नगरपालीकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. त्यामुळे इथल्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसून या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर भाजीबाजार, भाजीविक्रेत व हातगाडी, टपरी दुकानांच्या अतिक्रमणामुळे कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या. त्याअनुषंगाने चंद्रशेखर यादव यांनी आपला फौजफाटा घेऊन काल दिनांक २६ जानेवारी रोजी सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन संबंधितांना आपापली दुकाने मागे घेण्याच्या सूचना केल्या.त्याप्रमाणे त्यांनी आपली दुकाने मागे घेतली होती. ही कारवाई ४ तास चालली. पोलीस निरीक्षक यादव यांनी अनेक ठिकाणी असा प्रयोग करून वाहतुकीची समस्या सोडवली आहे.
त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिनांक २७ रोजी सोबत घेऊन सकाळपासून २ ते अडीच तास नायलॉन दोरीचा प्रयोग राबवून या दोऱ्या लोखंडी खिळ्याने मजबूत ठोकण्यात आल्या आहेत. यापुढील काळात दोऱ्यांच्या आतील बाजूलाच भाजी विक्रेत्यांनी बसावे अशा सूचना दिल्या. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल त्यांना कारवाई ला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला आहे. या अनोख्या उपक्रमाचे सिन्नरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पो.हवा.सुकदेव जाधव, माणिक टिळे,पो.ना.विनोद गोसावी, समाधान बोराडे, धनाजी जाधव, हेमंत तांबडे, अंकुश दराडे, कृष्णा कोकाटे, मंगलसिंग सोनवणे, प्रकाश चव्हाण तसेच सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अमित रायते, प्रशांत गरगटे, सागर वराडे, गणेश जगताप आदींनी याबाबत परिश्रम घेतले.