नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणकडून नाशिक व मालेगाव मंडळ कार्यालयात “स्वागत सेल” कार्यान्वित करण्यात आला असून शुक्रवारी (दि. २६ जानेवारी) रोजी विद्युत भवन नाशिक येथे नाशिक मंडळाच्या “स्वागत सेल” चे फीत कापून उदघाटन महावितरणचे माजी संचालक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मालेगाव मंडळाच्या “स्वागत सेल” चे फीत कापून उदघाटन प्रभारी अधिक्षक अभियंता शैलेश जैन यांच्या हस्ते करण्यात आले
नाशिक मंडळातील स्वागत सेलच्या उदघाटनप्रसंगी नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व महेंद्र ढोबळे, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता योगेश निकम, राजाराम डोंगरे, चेतन वाडे, नंदकिशोर काळे व निलेश चालीकवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, वरिष्ठ व्यवस्थापक सचिन भडके, व्यवस्थापक मंगेश गाडे यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मालेगाव मंडळाच्या स्वागत सेलच्या उदघाटनप्रसंगी वरिष्ठ व्यवस्थापक रामेश्वर कुमावत, उपकार्यकारी अभियंता सुनील कुमावत व अश्विनी इष्टे, व्यवस्थापक बादल शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, औद्योगिक ग्राहक व विद्युत कंत्राटदार उपस्थित होते.
औद्योगिक ग्राहकांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व सेवा कायम ठेवून नवीन वर्षानिमित्त ही अतिरिक्त सेवा सुरु करण्यात आली आहे. “स्वागत सेल”शी संपर्क साधल्यानंतर संबंधित कामासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी जाऊन कागदपत्रांची पुर्तता करण्यासह विनाविलंब सेवा देण्यात येणार आहे. यामुळे औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी, इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येणार आहे.
स्वागत सेल संपर्क क्रमांक व ईमेल
नाशिक मंडळ
संपर्क क्रमांक: ७८७५७६८८०८
ईमेल: swagatcellnashik@gmail.com आणि swagatcell_nashik@mahadiscom.in
मालेगाव मंडळ
संपर्क क्रमांक: ९०२९१६६३४६
ईमेल: swagatcell_malegaon@mahadiscom.in आणि semalegaon@gmail.com
नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभारसंबंधी “स्वागत सेल”कडे मागणी नोंदविल्यानंतर संबंधित औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, शुल्क आदींची माहिती दिल्या जाईल. दोन कार्यालयीन दिवसांत कागदपत्रांची पुर्तता, ऑनलाइन अर्ज व प्रक्रिया शुल्क भरण्याची कार्यवाही महावितरणकडून ग्राहकांच्या दारी जाऊन केली जाईल. त्यानंतर लगेचच स्थळ पाहणीच्या तांत्रिक अहवालानुसार फर्म कोटेशन देण्यासह नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु होईल. यासोबतच वीजसेवा किंवा बिलिंगच्या प्राप्त तक्रारींचे सेवेच्या कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत किंवा त्यापूर्वीच निराकरण करण्यात येणार आहे.