नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फोनवर बोलत जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल हिसकवणा-या सिडकोतील दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या अटकेने अनेक गुह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश शांताराम गायकवाड (१९) व अक्षयकुमार समाधान पगार (२० रा. दोघे महाकाली चौक,सिडको) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
मोरवाडी येथील राहूल अश्रु हिवाळे (२२) हा युवक मंगळवारी (दि.२३) रात्री मोरवाडीतील दत्तमंदिर भागातून फोनवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली होती. पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील सुमारे १५ हजाराचा मोबाईल हिसकावून नेला होता.
याप्रकरणी पोलीस दप्तरी जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून दोघांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.