नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जातीवाचक शिवीगाळ करीत महिलेच्या घरात घुसून टोळक्याने विनयभंग करीत जबरीलुट केल्याची घटना बेथले नगर भागात घडली. मिळकतीवर बेकायदेशीर कब्जा करण्याच्या उद्देशाने हा वाद झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंग,जबरीलुट अॅट्रोसिटी व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश जॉन, कविता जॉन, योगेशचे दोन भाऊ,वहिनी, लकी मोहिते व सुरेश सुतार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून पोलिसांनी योगेश विठ्ठल जॉन (३६ रा.आदिती पार्क पाथर्डी फाटा) व पावलस विठ्ठल जॉन (रा.उत्तमनगर,सिडको) या दोघा भावांना अटक केली आहे.
याबाबत जुने पोलीस आयुक्तालयासमोरील बेथलेनगर भागात राहणा-या २२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. गुरूवारी (दि.२५) सकाळच्या सुमारास महिला घरात एकटी असतांना संशयित टोळक्याने बेकायदेशीर घरात प्रवेश करून तिला जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी झटापटीत महिलेचा विनयभंग करण्यात आला. तसेच तिच्या गळय़ातील मंगळसूत्र बळजबरीने काढून घेण्यात आले. अधिक तपास सहाय्यक आयुक्त धुमाळ करीत आहेत.