कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कळवण तालुक्यातील वीज वितरण प्रणालीचे नूतनीकरण होणार असून जुन्या आणि जीर्ण झालेली वीज वितरण प्रणाली व पोल बदलण्यात येऊन तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील वीज ग्राहकांना अखंडीत व दर्जेदार वीज पुरवठा मिळण्यासाठी तालुक्यातील विविध विद्युत विषयक कामांना ८ कोटी २४ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.
कळवण-सुरगाणा मतदार संघातील आदिवासी भागातील ३३ के.व्ही वीज वाहिनीचे जाळे अंदाजे २५ ते ३० वर्षे जुने असून त्याची क्षमता सध्या या जाळ्यावर असलेला भार पेलण्यास अपुरी आहे. या जुन्या व जीर्ण झालेल्या वीज वितरण प्रणालीमुळे तालुक्यातील ग्राहकांना अखंडीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी अडथळा निर्माण होतं आहे. त्यामुळे विद्युत अपघातांची शक्यता वाढली आहे.त्यामुळे वीज वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणे व नूतनीकरण करणे आवश्यक आहे. तसेच लिंक लाईनच्या कामामुळे वितरण प्रणाली अतिभारीत होण्याचे प्रमाण कमी होऊन भार व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे .त्यामुळे ग्राहकांना अखंडीत व दर्जेदार वीज पुरवठा देणे शक्य होईल. तसेच वीज वितरण हानी कमी होईल व विद्युत अपघातांना आळा बसणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.
३३ के.व्ही अभोणा फिडरचा अतिभार कमी करण्यासाठी १३२ के.व्ही. कळवण ते ३३/११ के.व्ही. अभोणा उपकेंद्र दरम्यान नवीन ३३ के. व्ही. लिंक लाइन टाकणे, ३३ के. व्ही अभोणा फीडरचे नूतनीकरण करण्यात येणार असून कळवण ते मानूर, पाळे, अभोणा दरम्यान विद्युत नूतनीकरण कामे करण्यात येणार आहे.३३ के. व्ही. चणकापूर फीडरचे नुतनीकरण करण्यात येणार असून अभोणा ते भगुडी, दत्तनगर, चणकापूर दरम्यान विद्युत नूतनीकरण कामे करण्यात येणार आहे. ३३ के. व्ही. नांदुरी फीडर अपग्रेडेशन मधील गंजलेलेपोल व क्रॉसआर्म्स बदलण्यात येणार आहे.अभोणा येथे ३३ के. व्ही अभोणा फिडर ओव्हरहेडचे भूमिगत UG वाहिनीमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.कळवण येथे ३३ के. व्ही अभोणा फिडर ओव्हरहेडचे २ किमी भूमिगत UG वाहिनीमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली