नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्ज पुरवठा करणा-या फायनान्स कंपनीसह एका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर कर्ज काढण्यात आल्याचे समोर आले आहे. कर्जाची परतफेड न झाल्याने कर्जदाराचा सिबील स्कोर कमी झाल्याने हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशू अशोक मिश्रा (रा.त्रिमुर्ती चौक,सिडको) व टाटा कॅपीटल फायनान्स कंपनी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहित रमेश पगार (रा.बेळे कॉलनी भुजबळ फार्म) यांनी फिर्याद दिली आहे. पगार यांचे बनावट आधार व पॅनकार्ड बनवून ही फसवणुक करण्यात आली आहे. १ मे २०२३ ते २४ जानेवारी दरम्यान संशयित मिश्रा याने पगार यांचे बनावट कागदपत्र बनवून परस्पर टाटा कॅपिटल फायनान्स कंपनी लि.त्र्यंबकनाका सिग्नल येथून १ लाख ३ हजार ६९३ रूपयांचे कर्ज काढल्याचे तपासात पुढे आले आहे.
या कर्जाची परतफेड न झाल्याने पगार यांचा बॅकिंग क्षेत्रासाठी लागणारा सिबील स्कोर अचानक कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने चौकशीत परस्पर काढण्यात आलेल्या कर्जाचा भांडाफोड झाला. संशयितासह शहानिशा न करता कर्ज पुरवठा करणाºया फायनान्स कंपनीविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.