नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा व सत्र न्यायालयाने पादचारी महिलेची वाट अडवित विनयभंग करणा-या आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावास आणि २१ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. २०२० मध्ये याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मनिषा कुलकर्णी यांच्या कोर्टात चालला.
अयुब अब्बासअली शेख (४७ रा.अष्टविनायकनगर,केवलपार्क) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चुंचाळे शिवारातील दत्तनगर भागात राहणारी पिडीता १७ मार्च २०२० रोजी रात्री आपल्या घर परिसरातून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली होती. आरोपीने तिचा रस्ता अडवित तु मला फार आवडते असे म्हणून विनयभंग केला. यावेळी पिडीतेने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने शिवीगाळ करीत तिला मारहाण केली. तसेच पीडितेसह तुझ्या पतीस जीवे मारण्याची धमकी देत शहरात राहू देणार नाही असा दम भरला होता.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले होते. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र.८ च्या न्या. मनिषा कुलकर्णी यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अॅड. शैलेंद्र बागडे यांनी काम पाहिले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस वेगवेगळय़ा कलमान्वये शिक्षा सुनावली.