इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : ‘इंडिया आघाडी’च्या स्थापनेची पहिली बैठक झालेल्या बिहारमधूनच ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने कोणताही निर्णय घेण्याअगोदर सत्तांतर घडवण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. आता फक्त एका फोन कॉल आला, की संयुक्त जनता दल आणि भाजपत दिलजमाई होईल. बिहारमध्ये आजच मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदावरुन लालन सिंह यांना दूर केले. ते स्वत: पक्षाचे अध्यक्ष बनले. ‘इंडिया’ आघाडीच्या संयोजकपदावर नियुक्ती न झाल्याने ते नाराज होते; परंतु नितीशकुमार यांच्या नावाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संयोजकपदाचा प्रस्ताव आणून नितीशकुमार यांना शह दिला.
लोकसभा निवडणुकीसोबत बिहारची विधानसभा भंग करून मध्यावधी निवडणूक घेण्याच्या चर्चा होत्या; परंतु मुदतुपूर्व निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांचे आमदार तयार नाहीत. बिहारचे मुख्यमंत्रिपद नितीशुकमार यांच्याकडे कायम ठेवून भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. सुशीलकुमार मोदी, सम्राट चौधरी आणि रेणू देवी यापैकी दोघांची वर्णी लागेल.