इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी मुंबई : मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात रात्री तीन तास झालेल्या चर्चेच्या वेळी सुधारित अध्यादेश सुपूर्द करण्यात आला. त्य़ात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्याबरोबरच जरागे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.
जरांगे पाटील म्हणाले, की समाज म्हणून आमचा आता मुख्यमंत्री शिंदे यांना कोणताही विरोध राहिलेला नाही. मी सगळ्यांना विचारून शिंदे यांना उपोषण सोडवण्यासाठी बोलावले आहे. आता मुंबईत जाण्याची गरज नाही.
रात्री उशिरा राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्यांशी प्रदीर्घ चर्च केली. चर्चेतून मार्ग निघाला. त्यात जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करून तसा अध्यादेश निघाला. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्याचा, तसेच त्यांच्या कुटुंबानासुद्धा प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य झाली आहे. सरकारने सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला असून, आंतरवली सराटीत मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले पोलिस हल्ल्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.
वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमण्यात येणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडल्याबाबत शिंदे समिती गॅझेट काढून काम करणार असून विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षण देण्याचे काम केले आहे ,अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.