इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीने इतर मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. महाविकास आघाडीमध्ये ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ला सामावून घेण्यास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांत मतैक्य झाले आहे.
राज्यातील महाविकास आघाडीत ‘वंचित’ला दोन, तर ‘स्वाभिमानी’ला एक अशा तीन जागा ठाकरे गटाच्या कोट्यातून दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सर्वाधिक जागा ठाकरे गटाला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यावर या बैठकीत एकमत झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा असून, त्यापैकी चार जागा ठाकरे गटाला सोडण्यावर एकमत झाले आहे.
या बैठकीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर शिवसेना ठाकरे गटाकडून खा. संजय राऊत आणि खा. विनायक राऊत आणि ‘माकप’चे प्रतिनिधी उपस्थित होते. ही बैठक सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मानापमान नाट्य सुरू होते. त्यांनी आघाडीत अन्य पक्षाच्या समावेशाचा अधिकार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नसल्याचे पत्र व्हायरल केल्याने गोंधळ उडाला. लोकसभेची जागा जिंकण्यासाठी तुल्यबळ उमेदवार ज्यांच्याकडे असेल, त्या पक्षाला तो मतदारसंघ सोडण्यावर आणि काही मतदारसंघांची अदलाबदल करण्यावर चर्चा झाली. दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला तर दोन जागा काँग्रेसला सोडण्याची शक्यता आहे.