इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
निफाड येथील बाकडदरे शिवारात अंकुश वसंतराव कातकडे यांच्या घरी नाशिक अन्न व औषध प्रशासन, नाशिक ग्रामीण पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत भेसळयुक्त दुधाचा ४८ हजार १६४ रुपयाचा साठा जप्त केला. सदर भेसळयुक्त पदार्थांपैकी दूध पावडरचे पुरवठादार हेमंत पवार, शहा,पंचाळे, ता. सिन्नर व तेल सदृश पदार्थ सिन्नर माळेगांव येथील मोहन आरोटे यांनी पुरवठा केला असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर विक्रेता व पुरवठादार यांच्यावर अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये तपासासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत डेअरी परमीट पावडर १६ किलो किंमत २२४० रूपये, व्होल मिल्क पावडर ३२ किलो किंमत ७६८० रूपये, तेलसदृश पदार्थ १६८ लिटर किंमत २५७०४ रूपये व भेसळयुक्त गाय दूध ४१८ लिटर किंमत रूपये १२ हजार ५४० असा एकूण ४८ हजार १६४ रूपये किमतीचा साठा जप्त केला. सदर भेसळयुक्त गाय दुध हे भेसळयुक्त व नाशवंत असल्याने मानवी सेवनास येऊ नये या उद्देशाने जागेवरच नष्ट करण्यात आले
या कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासानाने माहिती देतांना सांगितले की, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अतुल वसंतराव कातकाडे याचे राहते घर, बोकडदरे शिवार, स्मशानभूमी जवळ, कातकाडे मळा, गट नंबर -३१/१/ब/२, ता. निफाड, जि. नाशिक येथे तपासणी केली असता सदर ठिकाणी एक व्यक्ती दूधाच्या प्लॅस्टिक कॅन मध्ये काही पदार्थ मिसळवत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पंचासमक्ष सदर परिसराची झाडाझडती घेतली असता सदर ठिकाणी डेअरी परमीट पावडर १८ किलो, व्होल मिल्क पावडर ३४ किलो, तेलसदृश पदार्थ १७० लिटर व वरील पदार्थांची भेसळ करून बनविलेले ४२० लिटर गाय दूधाचा साठा विक्रीसाठी तयार केल्याचे आढळून आले.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी व योगेश देशमुख यांनी विभागाचे सह आयुक्त सं. भा.नारागुडे व सहाय्यक आयुक्त उदय लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सदर कारवाईत विशेष पथक, नाशिक ग्रामीण व निफाड पोलीस स्टेशनचे पथक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाने दिली ही माहिती
निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध बनवणा-या इसमावर ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. आज सकाळचे सुमारास निफाड पोलीस ठाणे हद्दीतील बोकडदरे शिवारात कातकाडे मळा परिसरात संशयीत इसम नामे अतुल वसंतराव कातकाडे हा त्याचे राहते घरात रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध बनवित असल्याची गुप्त बातमी ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाचे पोलीस उपअधीक्षक विशाल क्षीरसागर यांना मिळाली होती. सदर बातमी प्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक विभागाकडील अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी व योगेश देशमुख यांचेसह सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता, त्याठिकाणी इसम नामे अतुल वसंतराव कातकाडे, रा. बोकडदरे, कातकाडे मळा, ता. निफाड हा स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी दूधात पांढरे रंगाचे द्रव पदार्थाचे मिश्रण करतांना मिळून आला आहे. सदर ठिकाणाची पोलीसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याठिकाणी प्रभात मिल्क पावडर, मिल्की मिस्ट पावडर तसेच तेलयुक्त रसायन व पावडर मिश्रीत दूध असा एकूण ४८,१६४/- रूपये किंमतीचा साठा मिळून आला आहे.
यातील इसम नामे अतुल वसंतराव कातकाडे हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वरील रासायनिक पदार्थापासून भेसळयुक्त दूध तयार करून विक्री करत असतांना आढळून आला आहे. सदर रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले दूध हे मानवी शरिरास घातक आहे व त्यामुळे मानवी शरिरावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे माहित असतांना देखील वरील इसम नामे अतुल कातकाडे व त्याचेसह घातक रसायन पुरवठा करणारे पुरवठादार व संगनमत असणारे इतर व्यक्ती यांचेविरुध्द अन्न सुरक्षा अधिकारी श्री. उमेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाणे येथे अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (१), २६ (२) (i) शिक्षा कलम ५९ सह भादवि कलम ३२८, २७२, २७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शनानूसार विशेष पथकाचे पोलीस उपअधीक्षक विशाल क्षीरसागर, पोहवा मनिष मानकर, पोना जगदीश झाडे, रविंद्र गवळी, संदिप सांगळे, मोहित निरगुडे, तसेच निफाड पोलीस ठाण्याचे सपोनि पाटील, पोउनि पटारे, पोकॉ दरोडे, सानप, मपोना कोकणे, शिंदे यांचे पथकाने सदर कारवाई करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.