इंडिया दर्पण वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे या शहराकडे संपूर्ण देशाचे विशेष लक्ष लागले असते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील क्रिकेट स्टेडियमचे संकल्पचित्र सोशल मिडियावर शेअर केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा होत आहे.
वाराणसी येथे क्रिकेट स्टेडियम होणार ही बातमी कळताच संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्टेडियमचे भूमिपूजन होणार म्हटल्यावर तर क्रिकेटविश्वामध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली. या सोहळ्याला भारतरत्न सचिन तेंडुलकर, लिटील मास्टर सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री या दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्टेडियमचे संकल्पचित्र सोशल मिडियावर शेअर केले. वाराणसी येथील राजतलाबच्या गंजारी याठिकाणी ३० एकरांपेक्षा जास्त जागेत हे स्टेडियम उभारले जाणार आहे. स्टेडियमच्या मुख्य इमारतीची रचना भगवान शंकराच्या डमरूप्रमाणे करण्यात आली आहे. या स्टेडियमची एकूणच थीम धार्मिक असणार असून यामध्ये काशीची झलक बघायला मिळणार आहे. स्टेडियमच्या सजावटीसाठी बेलपत्राच्या आकाराचे धातूचे पत्रे वापरले जाणार आहेत. कारण भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केले जाते. या स्टेडियमचे फ्लडलाइट त्रिशूळाच्या आकारात असतील.
२०२५ पर्यंत पूर्ण होणार
वाराणसीचे हे क्रिकेट स्टेडियम २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या स्टेडियमच्या उभारणीसाठी साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च आहे. उत्तर प्रदेश सरकार भूसंपादनासाठी १२१ कोटी रुपये व बीसीसीआय ३३० कोटी रुपये खर्च करणार आहे. याठिकाणी ३० हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था असणार आहे.