इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाटणाः बिहार विधानसभा बरखास्त करून मुख्यमंत्री नितीशकुमार लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक घेण्याची खेळी करू शकतात. त्यांनी ‘इंडिया’आघाडीची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचे ठरविले आहे, असे समजते.
भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ‘आमच्या विचारधारेवर जो विश्वास ठेवतो, तो स्वीकारण्यास आम्ही मागे हटणार नाही,’ असे शाह यांचे वक्तव्य पुरेसे सूचक आहे. बिहारमधील अचानक तापलेल्या राजकारणात भाजप खासदार राकेश सिन्हा पाटण्याहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमारही आपल्या रणनीतीवर वेगाने काम करत आहेत. नितीश यांच्यांशी चर्चा केल्यानंतर पक्षाचे माजी अध्यक्ष लालन सिंह आणि अर्थमंत्री विजय कुमार चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सरकार वाचवण्यासाठी संयुक्त जनता दल काँग्रेसचे आमदार फोडू शकते. बिहारमधील काँग्रेसचे १३ आमदार संयुक्त जनता दलाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना फोडल्यानंतर आणि भाजपच्या पाठिंब्याने नितीशकुमार बिहारमध्ये आपले सरकार कायम ठेवू शकतात. भाजपसोबत एकत्र येऊन मोदी लाट आणि राम लाटेवर स्वार झालेले नितीशकुमार बिहारमध्ये मोठा राजकीय फायदाही घेऊ शकतात.