नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतून दूरदृश्य प्रणालीद्वारे जम्मूमध्ये ई-बस सेवा सुरू केली आणि जम्मू आणि काश्मीर एकत्रित परीक्षा-2024 आणि अनुकंपा नियुक्तीसाठी एक हजाराहून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण केले.
आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, आजचा कार्यक्रम अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे कारण 100 पूर्ण वातानुकूलित ई-बस जम्मूच्या लोकांना समर्पित करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, 561 कोटी रुपये खर्चून या बसेसच्या 12 वर्षांच्या संचलन आणि देखभालीसह हा प्रकल्प सुरू झाला आहे. शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगभरात पर्यावरण विषयक जागरूकता पसरवली आहे आणि या दिशेने भारतात सर्वोत्तम पावले उचलली गेली आहेत. ते म्हणाले की, मोदी सरकारने संपूर्ण देशात ई-बससाठी विविध योजना लागू केल्या आहेत आणि त्याच उपाययोजनांतर्गत आज जम्मूला 100 ई-बस मिळाल्या आहेत.
त्यापैकी 25 बसेस 12 मीटर लांबीच्या तर 75 बसेस 9 मीटर लांबीच्या आहेत. शाह पुढे म्हणाले की, जम्मूच्या लोकांसाठी एक विश्वासार्ह, आरामदायी, किफायतशीर आणि टिकाऊ सार्वजनिक वाहतूक सुविधा आजपासून सुरू झाली आहे. या बसेस जम्मू ते कटरा, कठुआ, उधमपूर आणि जम्मूच्या अंतर्गत मार्गांवरही धावतील. या बसेसमुळे येणाऱ्या काळात लोकांच्या येण्या-जाण्याच्या समस्या तर दूर होतीलच शिवाय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही त्या अत्यंत उपयुक्त ठरतील.