मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी १२ तास ‘ईडी’ समोर चौकशी झाली. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात होते, असे सांगण्यात आले होते. परंतु आता आता आ. पवार यांच्या ‘ईडी’च्या चौकशीवेळी स्वतः शरद पवार ‘ईडी’ कार्यालयात हजर होते, माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
‘बारामती अॅग्रो’मधील कथित आर्थिक गैरव्यवहार तसेच कन्नड साखर कारखान्याच्या अल्पदरातील खरेदीप्रकरणी आ. पवार यांची मुंबईत ‘ईडी’ समोर सलग १२ तास चौकशी झाली. या चौकशीला सामोरे जाताना आ. पवार हे शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊन ‘ईडी’ कार्यालयात गेले होते, तर त्याच्या शेजारीच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार चौकशी होईपर्यंत थांबून असल्याचा दावा करण्यात आला होता.परंतु आता वेगळीच माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटद्वारे पुढे आली आहे.
राष्ट्रवादीच्या या ट्विटध्ये म्हटले आहे, की आज महाराष्ट्रात सत्य, निष्ठा आणि अमाप प्रेमाचा एक अनोखा प्रसंग अनुभवायला आला. महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांच्यावर लावलेल्या जुलुमी आणि बनावट आरोपांविरुद्धच्या लढ्यात अनेक समर्थकांनी, पक्षश्रेष्ठीनीं तसेच स्वतः शरद पवार यांनी मैदानात उतरून त्यांचे समर्थन केले. आ. रोहित यांना साथ देण्यासाठी स्वतः शरद पवार १२ तास ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहिले. कोणी कितीही विष पेरले, तरी महाराष्ट्र सत्याच्या आणि निष्ठेच्याच बाजूने कायम उभा राहील. याची प्रचिती आली.