धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्रोही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या दरम्यानच्या आग्रारोडवरुन संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. खान्देशातील अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर सह खान्देशातील धुळे जिल्ह्यातील विद्रोही साहित्यीक समविचारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते योगदान देत आहेत. त्याचाच भाग म्हणून संमेलनाच्या आयोजनात आणि संयोजनात सर्वसामान्यांचा देखील हातभार लागावा, प्रातिनिधीक योगदान मिळावे यासाठी एकमुठ धान्य दान आणि एक रुपया देणगी मोहिम धुळे शहरातून ऐतिहासिक आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत आयोजित करण्यात आली होती.
विद्रोही साहित्य संमेलनात उत्सव नव्हेतर विचारांची उधळण होईल. घरुन भाकरी खावून विचार पुढे येणारे आपण असून शासनाचे कोणतेही अनुदान न घेता एक मुठ धान्य आणि एक रुपया सामान्यांकडून घेवून त्यांचा सहभाग महत्वाचा मानत हे संमेलन अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आले आहे.
यावेळी अविनाश पाटील, सुभाष काकूस्ते, किशोर ढमाले, रमेश बोरसे, अनिल देवपूरकर, सदाशिव सूर्यवंशी, भगवान पाटील, प्रणाली गायकवाड, एडवोकेट विशाल साळवे, नवल ठाकरे, सिद्धांत बागुल, दिलीप खिवसरा, बापूराव पाटील, रमेश पाकड, शांताराम पवार, कैलास पुलकर, संतोष मोरे, अशोक पवार आधी कार्यकर्ते उपस्थित होते.