नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील हरीकृष्ण लॉन्स भागात भरधाव कार आणि दुचाकीत झालेल्या अपघातात २२ वर्षीय परप्रांतीय मोटारसायकलस्वार ठार झाला. या अपघातात दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारा युवकही जखमी झाला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महंमद मकसुद शेख (२२ मुळ रा.बिहार हल्ली संजीवनगर,चुंचाळे शिवार) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून या अपघातात मोहम्मद मोनू शेख (२० रा.अंबड लिंकरोड चुंचाळे गाव) हा युवक जखमी झाला आहे. महंमद शेख व मोहम्मद शेख हे दोघे मित्र मंगळवारी (दि.२३) रात्री दिंडोरीरोडने दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. म्हसरूळ परिसरातील हरीकृपा लॉन्स भागातील खमंग हॉटेल समोर पुढे जाणा-या एमएच १५ एचसी ०१६८ या स्विफ्टकारने अचानक वळण घेतल्याने ही घटना घडली.
भरधाव दुचाकी कारवर जावून आदळल्याने महंमद शेख याचा मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला मोहम्मद शेख हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत मोहम्मद अस्लम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.