नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात घरात शिरून चोरट्यांनी रोकडसह दागिणे लंपास केले. या घटनेत चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचा ऐवज हातोहात लांबविला असून, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवधुत रामकृष्ण धांडे (रा.अथर्व अपा.कारगिल चौक,दत्तनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धांडे कुटूंबिय बुधवारी (दि.२४) आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात प्रवेश करून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या रोेकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ९५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
घरफोडीत ४१ हजाराच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रविवार कारंजा भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४१ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह मोबाईलचा समावेश आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत पाटील (रा.सावरकरनगर,गंगापूररोड) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पाटील यांच्या फावडे लेन भागातील पेठे हायस्कूल मागील घरात ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.२२) रात्री त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व मोबाईल असा ४१ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार उबाळे करीत आहेत.