मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेला मोर्चा आज रात्री मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे. दरम्यान आझाद मैदानावर आंदोलनाला पोलिसांनी परवाणगी नाकारली आहे. आंदोलन करावे इतकी मैदानाची क्षमता नाही असे कारण यावेळी देण्यात आले. खारघरमधील सेक्टर २९ मधील पार्कात आंदोलन करण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आझाद मैदानावर जाण्यावर जरांगे पाटील ठाम आहे.
परवाणगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मार्ग काढायचा म्हणून आतापर्यंत लोणावळ्यात थांबलो. आम्हाला सरकारला सहकार्य करायच आहे. तोडगा निघावा म्हणून थांबलो अजून तोडगा निघाला नाही. सरकारचे मोठे शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार आहे. आम्ही मुंबईत जाणारच, मुंबईकर आणि आमचे हाल होऊ नये म्हणून सरकारने मार्ग काढावे. मुख्यमंत्री व दोघा उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसुन तोडगा काढावा असे त्यांनी सांगितले.
पुण्याहून हा मोर्चा लोणावळ्यात दाखल झाला आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार १२ ते १४ तास या मोर्चाला उशीर झाला आहे. मराठा आंदोलक एक्सप्रेस हायवेवर चढू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पनवेलकडे येतानाचा मार्ग पोलिसांनी बदलला आहे. पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहे.
काल उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताची दखल घेत राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले असून या महामोर्चाला तिथेच रोखण्याची व्यूहनीती सरकारने आखली असल्याचे समजते. त्यासाठीच दोन दिवस वाशी येथील बाजार समितीला सुट्टी देण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येंने असलेले आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्यासह उद्या मुंबईत धडकून उपोषण सुरू करण्यापूर्वीच तो नव्या मुंबईतून पुढे येणारच नाही, अशी व्यवस्था सरकार करीत आहे.
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून आणि मुंबईत येण्यापासून जरांगे पाटील यांना रोखले नाही, तर मुंबई ठप्प होईल अशी याचिका ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. जरांगे पाटील यांना शहरात येण्यापासून रोखण्याचे आदेश देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली होती. त्यामुळे मराठ्यांचा मोर्चा नवी मुंबईतच अडविण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यामुळेच ही परवाणगी नाकारली आहे.
………