मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विरोधी पक्षांतील एका पाठोपाठ एक एक नेत्यांना हेरत ईडीने पुन्हा जोरदार मोहिम सुरु केली आहे. अगोदर रोहित पवार यांना नोटीस पाठवून त्यांची चौकशी सुरु असतांना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना कोरोना काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ‘ईडी’ने समन्स बजावले आहे.
याप्रकरणात अगोदरच शिवसेनेच्या सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. त्यानंतर आता संदीप राऊत यांची चौकशी होणार आहे. ‘ईडी’ने राऊत यांना पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी त्यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही चौकशी केली आहे. कोरोना काळात मुंबईमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसाठी महापालिकेने खिचडी वाटप केले होते. त्याचे कंत्राट आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय चव्हाण यांनी राजकीय दबावाखाली ‘फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस’ या खासगी फर्मला मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
शिवेसनेच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची कथित कोविड बॉडी बॅग प्रकरणी आज चौकशी होणार आहे. ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांनाही भूखंड घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने नोटीस बजावली होती. आता संदीप राऊत यांना समन्स बजावले आहे.