नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पश्चिम बंगाल पाठोपाठ पंजाबमध्ये ‘आप’ने लोकसभेच्या सर्व म्हणजे १३ जागा लढवण्याची घोषणा केल्याने ‘इंडिया’ आघाडीला दुसरा झटका बसला आहे. पंजाबमध्ये पक्ष एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे ‘आप’ने स्पष्ट केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’ नेते भगवंत मान म्हणाले, की पंजाबमध्ये आमचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. ते म्हणाले, आम आदमी पार्टीने पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी ४० उमेदवार निवडले आहेत. लोकसभेच्या १३ जागांसाठी पक्षाकडून उमेदवारांचे सर्वेक्षण सुरू आहे. एक जागा चंदीगडचीही आहे.
सकाळी ममता बॅनर्जींनी आघाडीला झटका दिला. त्यावेळे त्या म्हणाल्या की, आम्ही राज्यात लोकसभा निवडणूक एकट्याने लढवू. मी काँग्रेसला जागावाटपाचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी सुरुवातीला तो नाकारला. आमच्या पक्षाने आता बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आसाममधील उत्तर सलमारा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, की ममता बॅनर्जींशिवाय ‘इंडिया’ आघाडीची कोणीही कल्पना करू शकत नाही. ‘इंडिया’ आघाडी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवेल आणि सर्व मित्रपक्ष त्यात भाग घेतील. ममता दीदींचे आम्ही मतपरिवर्तन करू.
‘आप’ अजूनही दिल्लीत काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहे. आतापर्यंत येथील सात जागांसाठीचा फॉर्म्युला तयार झालेला नसून, ‘इंडिया’ आघाडी समिती आणि ‘आप’च्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत बैठक झाली आहे. या काळात दोन्ही पक्षांनी भाजपविरोधात एकजुटीचा पुनरुच्चार केला आहे.