सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जयहिंद लोक चळवळ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार २०२३ चा वितरण सोहळा नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उत्साहात पार पडला. कृषी आणि संलग्नित क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांना राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्या हस्ते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे, आ. सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे यांच्या प्रमुख उपस्थिती या सोहळा संपन्न झाला..
शरद आव्हाड यांनी हेल्दी फूड्स, दापूर या ‘दुग्ध व्यवसाय’ संस्थेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वतः IDD क्षेत्रात शिक्षण घेवून विविध संस्थामध्ये महत्त्वाची पदे भूषवलेल्या आव्हाड यांनी २०२१ साली आपल्या तीन मित्रांच्या साथीने आपल्या मुळगावी दापूर येथे हेल्दी फूड्स, दापूर या संस्थेची स्थापना केली. तालुक्याची दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायास प्रोत्साहन देणे व त्यांच्या दुध उत्पादनाला वेळेवर व उचीत भाव मिळावा तसेच ग्राहकांना शुद्ध व उत्तम दर्जाचे दूध व दुग्धजन्य पदार्थांची उपलब्धता व्हावी यासाठी शरद आव्हाड व त्यांची हेल्दी फूड्स संस्थेची टीम यशस्वीपणे कामगिरी करीत आहे.
आपला अनुभव व शिक्षणाचा फायदा आपल्या भागातील शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने शरद आव्हाड व त्यांचे सहकारी संदीप आव्हाड, संजय सांगळे, मनोज सांगळे हे त्यांच्या हेल्दी फूड्स संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असतात. मागील तीन वर्षात पाच हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांशी ते थेट जोडले गेले असून भविष्यात तीन लाख शेतकऱ्यांसोबत जोडण्याचा त्यांचा मानस आहे.
हेल्दी फूड्स या संस्थेला दुग्ध उत्पादकांची साथ आणि ग्राहकांचा मजबूत विश्वास लाभला असून हेच त्यांच्या यशस्वी कामगिरीचे गम्यक आहे. आव्हाड यांना मिळालेला राज्यस्तरीय युवा शेतकरी पूरस्कार हा त्यांच्यासोबत त्यांच्याशी जोडलेल्या सर्व दुग्ध उत्पादक बांधवांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.