नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चालकाने कारमध्ये ठेवलेल्या मालकाची तीन लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. कारच्या डॅश बोर्ड मध्ये ही रक्कम ठेवली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत गवळी (मुळ रा.वाशिम हल्ली सावरकरनगर) असे मालकाची रोकड चोरणा-या संशयित कारचालकाचे नाव आहे. याबाबत गणपत सुकदेव हाडपे (रा.सहदेवनगर,गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. हाडपे यांची स्कोडा कार चालविण्यासाठी गवळी अनेक महिन्यांपासून चालक म्हणून कार्यरत आहे.
हाडपे यांनी मंगळवारी (दि.२३) आपल्या कारच्या डॅशबोर्डच्या कप्यात तीन लाखाची रोकड ठेवली होती. सायंकाळच्या सुमारास ते जिल्हा परिषद भागात गेले असता ही घटना घडली. काम आटोपून हाडपे त्र्यंबकनाका सिग्नल भागात लावलेल्या आपल्या कारजवळ आले असता गवळी कार सोडून पसार झाल्याचे निदर्शनास आले. अनेकवेळा संपर्क साधूनही त्याचा सपर्क होवू शकला नाही. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.