इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याची तयारी इंडिया आघाडीने केली होती. पण, आता ममता बॅनर्जीच्या यांच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत फुट पडण्याची शक्यता आहे.
आज ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू.
मी भारताच्या आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ आघाडीचा पराभव करणे हे आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांकडे अवघे काही महिने शिल्लक नाही. एप्रिलच्या दुस-या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर होऊ शकते. त्यात ममता बॅनर्जीची भूमिका इंडिया आघाडीला धक्का देणारी आहे.
‘इंडिया’ आघाडीमधील विश्वासही डगमगला
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकाच राज्यात विजय मिळवता आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारली, तर तेलंगणात काँग्रेसने सरकार स्थापन केले. मिझोराममध्ये झेडपीएम विजयी झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. अशा स्थितीत निदान छत्तीसगडमध्ये तरी पक्ष आपले सरकार वाचवेल, अशी आशा होती. मध्य प्रदेशातही काँग्रेसचे पुनरागमन निश्चित मानले जात होते; मात्र निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हिंदी भाषक राज्यांत तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे ‘इंडिया’ आघाडीमधील विश्वासही डगमगला होता. त्यात आता ममात बॅनर्जी यांनी एकला चलोची भूमिका घेतल्यामुळे मोठा धक्का बसला आहे.