पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर मध्यरात्रीनंतर दीड तास चर्चा झाली; परंतु हा प्रस्ताव फेटाळून ते पुण्यात दाखल झाले. दरम्यान, मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय हा प्रस्ताव घेऊन मंगळवारी मध्यरात्री रांजणगाव येथे आले होते. त्यानंतर पहाटे चार वाजेनंतर दीड तास त्यांनी या प्रस्तावावर जरांगे यांच्यांशी चर्चा केली. मुंबईचा दौरा टाळा, असा आग्रह या अधिकाऱ्यांनी धरला. पण जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना आज सकाळी साडेपाच वाजता परतले.
दरम्यान, मुंबईत मंगळवारपासून १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेली जरांगे यांची पदयात्रा मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास रांजणगाव परिसरातील मैदानावर आली. त्यानंतर सव्वादोन ते सव्वातीन वाजेपर्यंत त्यांनी मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तोपर्यंत विभागीय आयुक्त आर्दड व छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे त्यांची मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते. मुंबईतील अधिकारी त्यांना चर्चेतून काहीतरी मार्ग काढण्यासाठी बजावत होते.