नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तब्बल ५५ वर्षानंतर आनंदाने एकत्र आलेल्या वर्ग मित्र मैत्रिणींच्या आनंदावर एका प्रख्यात अभिनेत्रीने विरजण टाकलेच टाकले, परंतू त्यांची मोठी आर्थिक फसवणूकही केली. यामुळे सर्वांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेक वेळा मागणी करूनही आर्थिक भरपाई न दिल्याने शेवटी त्या अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
इंदोर येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील १९६८ च्या बॅचचे मित्र मैत्रिणी अमेरिका, युरोप, मलेशिया, इंग्लंड आदी देश आणि भारतभर विखुरले आहेत. साठी पार केलेले कुणी निष्णात डॉक्टर, कुणी मोठ्या हॉस्पिटल चे मालक तर कुणी वर्ग एकचे सरकारी अधिकारी म्हणून निवृत्त झालेले. या सर्वांना एकत्र आणण्याची कल्पना नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या आणि वर्ग एक च्या सरकारी डॉक्टर म्हणून निवृत्त झालेल्या डॉ श्रीमती अरूणा वानखेडे यांना सुचली. सर्व मित्र मैत्रीणीना याबाबत सांगितले असता, नोव्हेंबर २०२३ मध्ये गोव्यातील एका रिसॉर्ट मध्ये भेटायचे ठरले. त्याप्रमाणे दोन दिवसीय कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. भेटीची आठवण म्हणून सर्वांचे सत्कार करावयाचे ठरले.
हा सत्कार कुणा तरी स्टार व्यक्तीच्या हस्ते करायचा म्हणून त्यांच्या काळातील स्टार अभिनेत्री मौसमी चटर्जी यांना बोलवायचे ठरले. त्यासाठी नाशिकमधील दिपाली चव्हाण यांच्या मध्यस्तीने चटर्जी यांच्याशी संपर्क करून तारीख व मानधन ठरवण्यात आले. पैकी २ लाख रुपये लगेच चटर्जी यांच्या बँक खात्यावर डॉ वानखेडे यांनी पाठवले. उर्वरित रक्कम कार्यक्रम स्थळी देण्याचे ठरले. तसेच चटर्जी यांनी सांगितलेल्या पंचतारांकित हॉटेल मध्ये त्यांची आणि सोबत त्यांची सहायक व दिपाली चव्हाण यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तिन्हीचे जाण्या येण्याचे विमान भाडे ही आयोजकांनी दिले.
गोव्यातील विमानतळावर एक दिवस आधीच चटर्जी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांनी कार्यक्रमात येवून जमलेल्या मित्र मैत्रिणींचे सत्कार करायचे होते, मात्र हॉटेलला पोहचल्यावर चटर्जी बाईंचा मुड खराब झाला. त्या आयोजकांना कॉलवर कॉल करून हॉटेलला बोलावू लागल्या. आयोजक इतर कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे चटर्जी बाईंचा पारा चढला, दुसऱ्या दिवशी आयोजकांना काही एक न कळवता कार्यक्रमाला उपस्थित न राहता त्यांनी मुंबई गाठली. यामुळे देश विदेशातून तब्बल ५५ वर्षांनी एकत्र आलेल्या मित्र मैत्रिनींचा चांगलाच हिरमोड झाला.त्यांच्या आनंदावर विरजण पडले. मनःस्तापही सहन करावा लागला.
यानंतर डॉ श्रीमती अरुणा वानखेडे यांनी मौसमी चटर्जी यांना दिलेली रक्कम व त्यांच्यावर केलेल्या खर्चाची मागणी करण्यासाठी फोनवरून आणि मेलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ना त्यांचा कॉल स्वीकारला ना मेल ला उत्तर दिले. शेवटी त्यांनी चटर्जी यांना वकीलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.