इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्र फारच गाजत आहे. नगर आणि वाशिम जिल्ह्यात शिक्षकांवरील हल्ले असो की पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळेत मुलांचे रॅगिंग प्रकरण असो, त्याचप्रमाणे शाळांचे खासगीकरण यासारख्या प्रश्नांमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी ढवळाढवळ, हालचाल आणि गडबड गोंधळ दिसून येत आहेत. त्यातच पुण्यासारख्या विद्येची नगरी समजल्या जाणाऱ्या शहरात पर्वती भागातील एका नामांकित शाळेमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी चक्क बाल वर्गातील मुलांचे रॅंगिग तथा लैंगिक शोषण सारखे प्रकार केल्याने नोटीस खळबळ उडाली आहे.
पहिलीतील विद्यार्थ्याला त्रास दिल्याप्रकरणी मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंग कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने मुख्याध्यापिके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा…
मुक्तानंद शाळेतील काही लहान मुलांनी आपल्या घरी जाऊन आई-वडील तथा पालकांकडे आम्हाला शारीरिक त्रास दिला असल्याचे तक्रार केली यासंदर्भात चौकशी केल्यानंतर पालकांना हा धक्कादायक प्रकार कळाला तेव्हा त्यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावी बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसह, मुख्याध्यापिका अनुपमा गुजराती यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संतप्त पालकांनी शाळा बंद पाडली. सोमवारी शेकडोच्या संख्येने पालक शाळेसमोर एकत्र आले. त्यांनी कारवाईची मागणी करत शाळा बंद केली. यावेळी संतप्त पालकांना समजवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यासंदर्भात तक्रार नोंदवा, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अद्याप कोणतीही कारवाई नाही !
शाळेतील लहान मुलांचे दहावी, बारावीच्या मुलांकडून लैंगिक शोषण होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. पहिली ते चौथीत असणाऱ्या मुलांना आणि मुलींना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून बॅड टच केला जात असल्याचा आरोप पालकांनी केला. याबाबतची माहिती मुख्याध्यापिका गुजराती यांना देण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मुलाची आई आणि अन्य पालकांनी सोमवारी शालेय प्रशासनाला जाब विचारला. मुलाच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.
शाळा प्रशासनाने मांडली बाजू
दरम्यान, याबाबत आपली बाजू मांडताना पुणे विद्यार्थी गृह कार्याध्यक्ष एस. पी. रेडेकर यांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापन कोणत्याही गैरप्रकारास पाठीशी घालत नाही. शाळेत घडलेल्या घटनेबाबत मुख्याध्यापिका यांना चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.