नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरातल्या २४ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधल्या सुमारे २५० प्राथमिक कृषी पत समित्यांचे (पीएसीएस) प्रमुख आणि त्यांचे जोडीदार कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन २०२४ साठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सहकार मंत्रालय, संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने विशेष अतिथींचे आदरातिथ्य करणार आहे.
सहकारातून समृद्धी’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार मंत्रालयाने, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली अल्प कालावधीत ५४ हून अधिक उपक्रम हाती घेतले आहेत. पीएसीएसचे संगणकीकरण हे मंत्रालयाच्या महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असून या अंतर्गत २५१६ कोटी रुपयांच्या तरतुदीसह ६३ हजार पीएसीएसचे संगणकीकरण केले जात आहे. आतापर्यंत २८ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातल्या १२ हजाराहून अधिक पीएसीएसचे संगणकीकरण झाले असून त्या राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेद्वारे (नाबार्ड ) विकसित ईआरपी (एंटरप्राइज रिसोर्स प्लानिंग) सॉफ्टवेअरवर आणण्यात आल्या आहेत.
राजधानीतील आपल्या वास्तव्यात विशेष अतिथी २५ जानेवारी रोजी सहकार राज्य मंत्री बी. एल. वर्मा यांची भेट घेणार असून रात्र-भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन संचलन पाहिल्यानंतर ते संध्याकाळी ‘भारत पर्व’ मध्ये सहभागी होतील.
सहकार मंत्रालय, प्रजासत्ताक दिनानिमित्त आमंत्रित या विशेष अतिथींसाठी दिल्लीतले वास्तव्य संस्मरणीय करण्यासाठी आणि पीएसीएसच्या संगणकीकरण योजनेचे यश दर्शवण्यासाठी प्रतिबद्ध आहे. ‘सहकारातून समृद्धी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याकरिता हा कार्यक्रम सहभागी पीएसीएसना प्रेरणा देईल.