इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक : देशातील फलोत्पादनातील आघाडीच्या ‘सह्याद्री फार्म्स‘ने २०२२-२३ या आर्थिक वर्षात मागील वर्षीपेक्षा २८ टक्के अधिक व्यवसायवृध्दी घेत १००७ कोटीची उलाढाल केली आहे. कंपनीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी कंपनीचे २ हजार शेतकरी सभासद, संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स ही द्राक्ष उत्पादन व निर्यातीतील तसेच टोमॅटो प्रक्रियेतील देशातील प्रथम क्रमांकाची कंपनी असून हे ‘सह्याद्री फार्म्स’ने हे स्थान मागील ७ वर्षांपासून सातत्याने टिकवून ठेवले आहे. आपल्या व्यवसायात सह्याद्रीने जागतिक दर्जाची प्रमाणके आणली असून जागतिक द्राक्ष बाजारात स्थान निर्माण केलेली ‘सह्याद्री फार्म्स‘ ही फलोत्पादनातील महत्वाची भारतीय कंपनी म्हणून ओळखली जात आहे.
या शिवाय डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, काजू, स्वीटकॉर्न या पिकातही ‘सह्याद्री फार्म्स काम करीत असून या विविध पिकांतील २४.५ हजार शेतकरी म्हणून थेट कंपनीशी जोडले आहेत. २०१२ मध्ये १३ कोटी उलाढाल असलेल्या ‘सह्याद्री फार्म्स’ने मार्च २०२३ अखेर उलाढालीचा १ हजार कोटीचा टप्पा पार केला आहे. ‘सह्याद्री फार्म्स’ला जोडून अन्य ४८ शेतकरी उत्पादक कंपन्या संलग्न आहेत,त्यांच्यामार्फत विविध फलोत्पादन तसेच प्रक्रिया प्रकल्पांवर काम सुरु आहे.
‘सह्याद्री फार्म्स‘शी संलग्न असलेल्या २४.५ हजार शेतकऱ्यांच्या ४०,००० एकर क्षेत्रातून येणाऱ्या २,७५,३२७ मे. टन उत्पादनावर प्रक्रिया व निर्यात केली गेली. याद्वारे निर्यातीतून सुमारे रुपये ३५२ कोटी उत्पन्न तर देशांतर्गत बाजारपेठेतून ६५५ कोटी उत्पन्न अशा प्रकारे एकूण १००७ कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला. यामध्ये ताज्या फळांची विक्री प्रमाण ५३% तर प्रक्रियायुक्त उत्पादने प्रमाण ४७% आहे. कंपनीकडे एकूण ५६ कोटी रुपयांचे भागभांडवल राखीव निधी रुपये २५६ कोटी आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या या कंपनीने या बरोबरच ५५८ कोटींच्या पायाभूत सुविधा (मालमत्ता) उभारण्यात आल्या आहेत. तसेच सुमारे १३०० पूर्णवेळ रोजगार व ४ हजार हंगामी रोजगार यातून निर्माण करण्यात कंपनीला यश आले आहे. १ हजार कोटींचा टप्पा शेतकऱ्यांच्या मालकीच्या कंपनीने पार पाडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांत एक आत्मविश्वास तयार झाला आहे.