नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किरकोळ कारणातून नाणेगाव येथे दोन कुटूंबियात झालेल्या तुंबळ हाणामारीत लाठ्याकाठ्यांचा सर्रास वापर करण्यात आल्याने दोन्ही गटातील सात जण जखमी झाले. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक काळे,ओमकार काळे व सविता काळे तसेच निखील काळे,मधुकर काळे सरला काळे,इंद्रयणी काळे अशी जखमींची नावे आहेत. अशोक आनंदराव काळे (रा.काळेमळा,नाणेगावरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.२१) रात्री ही घटना घडली. मधुकर काळे,निखील काळे,सरला काळे व इंद्रायणी काळे आदींनी माझ्या जागेत फ्लेवर ब्लॉक का बसविले असा प्रश्न उपस्थित करीत शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी संतप्त टोळक्याने लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. या हाणामारीत अशोक काळे यांच्यासह मुलगा ओमलाक काळे व पत्नी सविता काळे जखमी झाल्या आहेत.
तर निखील मधुकर काळे (रा.सदर) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार ओमकार काळे,अशोक काळे,सुरेश काळे,सोपान काळे,संगिता काळे,सविता काळे आदींनी रात्रीच्या सुमारास गट्टू बसविण्याच्या वादाची कुरापत काढून निखील याच्यासह त्याच्या आई वडिल व बहिणीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. या घटनेत निखील काळे,मधुकर काळे,सरला काळे व इद्रायणी काळे या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मिरजे व जमादार पाचोरे करीत आहेत.