नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारची काच फोडून दहशत पसरवणा-या विरुध्द म्हसरूळ पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठरोडवरील अश्वमेध भागात दोन जण हातात शस्त्र घेऊन दहशत पसरवत होते. या दोघांनी परिसरात पार्क केलेल्या कारची काच फोडली. पण, त्यानंतर पोलीसांनी वेळीच धाव घेत त्याच्या ताब्यातून शस्त्र हस्तगत केले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव रवी शिंदे (२० रा.राजवाडा निमाणी) व समीर संजय सोनवणे (१९ रा.तुलसी अपा.मागे सितागुंफा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अंमलदार वाय.एम.सस्कर यांनी फिर्याद दिली आहे.
नामको हॉस्पिटल परिसरात दोन तरूण धारदार शस्त्राचा धाक दाखवित दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२२) सायंकाळी पोलीसांनी धाव घेत ही कारवाई केले. तत्पूर्वीच संशयितांनी पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून नुकसान केले होते. अधिक तपास पोलीस नाईक वसावे करीत आहेत.