इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आसाममध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान पाच हजारांहून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांना गुवाहाटी शहरात प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात काँग्रेसचे अनेक नेते जखमी झाले. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह अनेक जणांवर विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी डीजीपीशी बोलून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गुवाहाटी शहराच्या रस्त्यात सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले, तेव्हा हा संपूर्ण गोंधळ झाला. या लोकांना शहरात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये आसाम प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया हेही जखमी झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुवाहाटी शहरात प्रवेश रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. यापूर्वी हिमंता बिस्वा सरमा सरकारने गुवाहाटीच्या मुख्य रस्त्यावरून काँग्रेस यात्रा काढण्यास परवानगी दिली नव्हती. गुवाहाटीमध्ये मंगळवारी कामकाजाचा दिवस असेल आणि यात्रेला परवानगी दिल्यास संपूर्ण शहरात ठप्प होईल, असे प्रशासनाने सांगितले. काँग्रेसने गुवाहाटीच्या मुख्य मार्गाकडे जाण्याऐवजी राष्ट्रीय महामार्गाकडे जावे, असे आसाम सरकारने म्हटले होते. याआधी सोमवारीही राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राहुल गांधी आणि जयराम रमेश यांच्यासह सर्व नेते रस्त्यावर बसून रघुपती राघव राजा राम भजन म्हटले.