इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्याः अयोध्यामध्ये राम मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर सकाळपासून दर्शनासाठी गर्दी उसळली होती. त्यामुळे दर्शन बंद करण्यात आल्याचे वृत्त आले होते. पण, या वृत्ताचे अयोध्या पोलिसांनी खंडण केले असून त्यांनी सांगितले की, काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अयोध्या जिल्ह्यात अनेक किलोमीटर लांब भाविकांच्या गर्दीमुळे श्री रामलल्लाचे दर्शन तात्पुरते थांबवण्यात आले आहे, अशा खोट्या बातम्या छायाचित्रांसह प्रसारित केल्या जात आहेत. अयोध्या पोलिस या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन करते.
रामललाच्या दर्शनासाठी सध्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या अयोध्येतील तापमान सहा अंशांवर आहे; मात्र कडाक्याची थंडी असूनही भाविकांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. सर्वजण राम रंगात रंगले आहेत. रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान झाल्यानंतर आजपासून भाविकांना दर्शन खुले झाले आहे. रामलल्लाचे दर्शन सकाळी आठपासून सुरु झाले आहे. त्यामुळे गर्दी झालेली आहे. पण, दर्शन बंद करण्यात आलेले नाही.
दुपारी मंदिर बंद
दुपारी दोन तास मंदिर बंद असेल. दुपारी १२ वाजता रामलल्लाची भोग आरती होणार असून सायंकाळी साडेसात वाजता आरती होणार आहे. यानंतर रात्री साडेआठ वाजता शेवटची आरती करून रामलल्लाला झोपवले जाईल. आरतीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन मोफत पास घेता येतील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाइटनुसार, वैध सरकारी ओळखपत्र दाखवून ऑफलाइन पास श्री रामजन्मभूमी येथील कॅम्प ऑफिसमधून मिळवता येतो.









