नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेरी लिंकरोडवरील औदूंबर लॉन्स येथे हळदीच्या कार्यक्रमात फोटोग्राफरची कॅमेरा बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या बॅगेत लेन्स,माईक,चार्जर बॅटरी,लाईट व मेमरी कार्ड असा सुमारे सव्वा तीन लाखाचा ऐवज होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कॅमेराच कॅमेराच्या कामी आला आहे. एका कॅमेराची चोरी झालेली घटना दुस-या कॅमेराने कैद केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रौफ शेख (रा.भाभानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून, रविवारी (दि.२१) ते मेरी लिंकरोडवरील औदूंबर लॉन्स येथे हळदीच्या कार्यक्रमानिमित्त गेले असता ही घटना घडली. वधू वरांना हळद लावत असतांना अज्ञात चोरट्यांनी कॅमेरा बॅग चोरून नेली.
या बॅगेत लेन्स, माईक, चार्जर बॅटरी, लाईट व मेमरी कार्ड असा सुमारे सव्वा तीन लाख रूपये किमतीचा ऐवज होता. ही बाब लॉन्स मधील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली असून २० ते २५ वयोगटातील तरूणाने या बॅगा पळविल्याचे समोर आले आहे. पोलीस फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत असून अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.